Saturday, April 19, 2008

वेदना जपून मी उरात ठेवतो...
हासराच चेहरा घरात ठेवतो...

तू मनात बैसली म्हणून साजणे..
आज ईश्वरास मंदिरात ठेवतो...

चंद्र जागतो अता पहावया तुला..
तो म्हणून रोज रोज रात ठेवतो...

आठवून कंठ दाटतो पुन्हा तुला..
मी तरी न हुंदका स्वरात ठेवतो...

प्रश्न तू करू नको उगाच साजणे..
मी अनेक प्रश्न उत्तरात ठेवतो...

पेटल्यावरी पुन्हा उरायला नको..
मी म्हणून जीव कापरात ठेवतो...

Thursday, November 29, 2007

किनारे...

सुर्याची विझली काया... पाण्यात उतरले तारे...
विरहाच्या रात्रीमध्ये छळतात नदीला वारे...

अज्ञानी असते जर मी त्रागा हा झाला नसता...
हाडांचे होते पाणी कळण्याने मजला सारे...

पदरात टाक तू माझ्या हक्काचे क्षण सोनेरी..
जन्माची व्याकुळता ही थोडीतर शमवुन जारे...

जेव्हाही नदिच्याकाठी मी नहावयाला येते..
पाण्याची होते धडधड.... वार्‍याचे अंग शहारे...

लोभ तुझा मज काही, ना द्वेश जराही राधे..
एकाच नदीचे आपण दोघेही दोन किनारे...

बस जराशा मी पणाने....

तोडली तू सर्व नाती बस जराशा मी पणाने....
राहिले काही न हाती बस जराशा मी पणाने....

वाहवा करुनी तुझी बघ काम त्यांनी अन्

फुगवली फक्त छाती बस जराशा मी पणाने....

लोक आता त्रासले, कंटाळले दुर्लक्षिण्याला..
एकदा घडणार क्रांती बस जराशा मी पणाने....

आसमंती पोचली असली तूझी किर्ती जरीही...
शेवटी होणार माती बस जराशा मी पणाने....

मारल्या गेलेत लाखो,मारल्या जातील लाखो..
लोक झाले आत्मघाती बस जराशा मी पणाने....

पारिजात...

पेटली तुझी धरा नि मी अधीर आसमंत...
ये समीप तू अजून मज बघायचा दिगंत....

चुंबिलेस ज्या फुलास; त्यास लाभला सुवास.....
वाहतो जणू नसात साजणे तुझ्या वसंत...

पाहते उभी दुरून; मौन व्यर्थ पांघरून....
आणखी कितीक वेळ पाहशी तुझाच अंत.....

कोरलीस तू अखेर; काळजावरी लकेर...
टाकले करून आज जीवनास भाग्यवंत....

काल मी तुझ्या तनात; ठेवलाय पारिजात...
दूर दूर चांदण्यात हीच बातमी ज्वलंत....

भ्रम....

अशीच रोज ती मला लपून पाहते...
पहावया नको कुणी जपून पाहते...

जरी असोत शेकडो उरात यातना
तरी मलाच रोज ती हसून पाहते...

मनातले अनेकदा लिहून फाडले
तरी पुन्हा मनातले लिहून पाहते...

उगाच पाडला पदर कशास तू गडे?

उगाच का अशी मला लवून पाहते...?

कधीतरी करेन मी तिचीच वाहवा
अशा भ्रमात रोज ती सजून पाहते...

कळेन एकदा मला तिच्या मनातले
म्हणून ती अबोलता सहून पाहते...

करावयास सिद्ध ही पवित्रता तिची
स्वत्:च विस्तवात ती जळून पाहते...

Wednesday, November 28, 2007

क्षणोक्षणी....

राहतो जरी तुझ्या नशेत मी क्षणोक्षणी....
जाणवे तरी मला तुझी कमी क्षणोक्षणी....

अंग अंग चिंब रंग खेळलो असा गडे..
की स्मरेल हीच रंगपंचमी क्षणोक्षणी....


वाट पाहुनी अधीरता शिगेस पोचली..
मी रहायचे कितीक संयमी क्षणोक्षणी..?

बोलणे नि भेटणे कमी करून टाकले..

मंद होत चालली तुझी हमी क्षणोक्षणी....

नाटकामधील काम संपले जरी तुझे...
जीवनातल्या सुरूच तालमी क्षणोक्षणी....